सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या प्रांगणात गेल्या दोन महिन्यांपासून कपाटात विसावलेला शालेय गणवेश विद्यार्थ्यांनी अंगावर आनंदात परिधान केला. शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्या कोऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवली. नवीन शिक्षक, नवीन पुस्तक, नवीन अभ्यासक्रम, नवीन पुस्तकाचा तो खास गंध.. श्वास भरून मुलांनी घेतला. सुट्टीत थोडे दूर गेलेल्या दप्तर व डबा यांच्याशी नव्याने मैत्री केली. आज कुणी आईचे, कुणी बाबांचे, कुणी रिक्षावाल्या दादांचे बोट धरून शाळेत आले होते.
शाळेतील फुगे, फुलांच्या माळा, रांगोळ्या काढून, गुलाब पुष्प देऊन शहनाईच्या सुमधुर स्वरात सर्वांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी खानविलकर मॅडम यांनी केले. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती तर मोठ्या वर्गातील माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी खूप दिवसांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींना कडकडून मिठी मारत शाळेचा पहिला दिवस एन्जॉय केला.
मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले,शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिल्या दिवशी गोड गोड शिरा सर्व विद्यार्थ्यांना देऊन दिवस गोड करण्यात आला. अशा मंगलमय आणि आनंदी वातावरणात आमच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडला.