मुंबई भांडुप (प) सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजारामशेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. निरंजन वसंत डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. या प्रसंगी शिक्षकसेना महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री जालिंदर सरोदे, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राष्ट्रपती पदक विजेते श्री दत्तात्रय खंडागळे, युवा नेत्या राजोल संजय पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक संचालक रमेश खानविलकर व शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या पारंपारिक नृत्यकलेचे सादरीकरण करून करण्यात आली.
शिक्षण संस्थेचे संचालक रिद्देश खानविलकर यांच्या संकल्पनेतून व शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. शिक्षक हरेश राणे, श्रीमती ज्योति दांडेकर , श्री महेश दहिभाते, श्री खुशराजसिंह संधु प्रणाली घाडी व इतर शिक्षकांच्या मेहनतीने शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे, पालकांचे विविध लेख, कविता, वैचारिक लेख असलेले “नवोन्मेष:”मासिकाचे प्रकाशन आमदार ॲड.निरंजन डावखरे यांनी करून “नवोन्मेष” विद्यार्थी मासिक संकल्पनेचे कौतुक करून,निश्चितपणे हे मासिक विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करेल अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या मनोगतात असेही म्हटले की, रमेश खानविलकर यांनी 30 वर्षांपूर्वी शिक्षणाचे लावलेल्या रोपट्याचे, वटवृक्षात रूपांतर झाले आहे. माझे वडील वसंत डावखरे विधान परिषदेचे सभापती होते तेव्हापासून आमचा व खानविलकर सरांचा ऋणानुबंध आहे तो त्याच्या शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाप्रमाणे वाढत जाणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक, या सर्वांना एकत्र घेऊन रिद्देश खानविलकर यांनी “नवोन्मेष:” हे शैक्षणिक मासिक सुरू केले व त्याचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले याचा मला गौरव आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणामधील नवनवीन गोष्टी शिकून, तुमच्या शिक्षणाची या समाजाला मदत होईल असे कार्य तुम्हा विद्यार्थ्यांकडून झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.