दरवर्षी प्रमाने या वर्षीही सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,आर. के. अध्यापक महाविद्यालय,भांडुप,मुंबई ७८ येथे २१ जून, २०२५ शनिवार रोजी, सकाळी ७:०० वाजता महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी यांनी केले होते.
यावर्षी योग दिनाचे महत्त्व आणि योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक फायदे यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य खिलौनि राऊळकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. योग ही भारताची एक प्राचीन विद्या असून, ती केवळ शारीरिक व्यायामापुरती मर्यादित नाही, तर ती मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत, योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत करतो. त्यांनी योगाचे जीवनातील महत्त्व विशद केले आणि सर्वांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
यावेळी योग प्रशिक्षकांनी प्रत्येक आसनाच्या फायद्यांची माहिती दिली, ज्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांना योगाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजले. त्यांनी योगाची मूलभूत तत्त्वे, विविध योगासने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, शलभासन, आणि शवासन यांसारख्या प्रमुख आसनांचे योग्य रीतीने कसे प्रदर्शन करावे, हे समजावून सांगितले. तसेच, अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी यांसारख्या प्राणायामांचे महत्त्व आणि ते कसे करावेत, याबद्दल सविस्तर माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने महाविद्यालयातील सर्वांना योगाचे महत्त्व आणि त्याचे फायदे याची जाणीव करून दिली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि त्यांना नियमित योगाभ्यासासाठी प्रेरणा मिळाली.भविष्यातही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटिबद्ध राहील.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील बी.एड. / डी .एड.,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र ,टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सर्व प्रवेशीत विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
